विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क पूर्णत माफ करा: सुशिलकुमार पावरा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क  पूर्णत माफ करा: सुशिलकुमार पावरा 
          
 गटशिक्षणाधिकारी दापोली यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परिक्षा फी पूर्णत:माफ करा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांच्या कडे निवेदन देऊन केली. आज दिनांक 5 जुलै  2021 रोजी  बिरसा फायटर्सचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांना गटशिक्षणाधिकारी दापोली बळवंतराव यांच्या मार्फत देण्यात आले. 
         निवेदनात म्हटले आहे की,
 मागील जवळपास एक - दीड वर्षांपासून कोरोनो महामारीच्या प्रभावामुळे लॉकडावूनमुळे कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमोडले होते. ज्याचा सर्वाधिक फटका विविध वर्गात, विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बसला. त्यांना शाळेने/महाविद्यालयाने/ विद्यापिठाने आकारलेले शैक्षणिक शुल्क भरण्यास शक्य नाही. 
          तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करता, हातावर पोट असणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. काही  बांधव वर्षातील 12 महिने मोल मजूरी करूनच ऊदरनिर्वाह करतो. त्यामुळे पाल्याची फी भरण्यास तो पूर्णपणे असमर्थ आहे. त्यातच मागील एक - दीड वर्षापासून कोरोना महामारीत रोजगार गेल्याने त्याचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याकरीता निवेदनाद्वारे विनंती की, आपल्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांच्या शाळा / महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अगदी इ. 1 ली पासून ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण, विविध व्यावसायिक शिक्षण, विविध विद्याशाखांत (वैद्यकीय, अभियांत्रिकी) शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परिक्षा फी (वर्ष 2020-21ते 2021-22) पूर्णत: माफ करण्याच्या सूचना संबंधित शाळा/महाविद्यालय प्रशासनाला निर्गमित करण्यात याव्यात,अशी मागणी सुशिलकुमार पावरा बिरसा फायटर्स यांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.  या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत.