जागतिक पर्यावरणदिनी ११ वृक्षांची लागवड
ग्रीन फाउंडेशनचा सक्रिय पुढाकार
दिग्रस: जागतिक पर्यावरण दिन, चिपको आंदोलनाचे प्रणेते स्व.सुंदरलाल बहुगुणा यांचे स्मृती प्रित्यर्थ,पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे आणि मूकनायक न्यूज चॅनेलचे संपादक धर्मराज गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीन फाउंडेशन शाखा दिग्रसच्या वतीने भवानी माता टेकडी उद्यानात एकूण अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली.
आज दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा विपरीत परिणाम मानवावर होताना दिसून येतो. आमच्या पूर्वजांनी निसर्गाला देवाची उपमा दिली आहे. मात्र हल्ली विकासाच्या नावाखाली आजच्या लोकांनी अगणित झाडे भुईसपाट केली आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून ग्रीन फाउंडेशनच्या वतीने स्थानिक प्रजातींच्या एकुण अकरा वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये पिंपळ, जांभूळ,कडुनिंब यांसारख्या झाडांचा समावेश आहे.वृक्षारोपण करून आगळेवेगळे पर्यावरण दिन,स्मृती दिन आणि वाढदिवस साजरा केल्यामुळे फाउंडेशनचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी पत्रकार संघटनेचे सचिव यशवंत सुर्वे,वनरक्षक संतोष बदूकले,पुरुषोत्तम कुडवे,खंदारे,सदानंद जाधव,धर्मराज गायकवाड, पर्यावरणप्रेमी जय राठोड, राम राठोड इत्यादी पत्रकार तर ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश हिरास,उपाध्यक्ष सुरेंद्र राठोड व वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.