पोकळ हार-तुरे आणि फटाक्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी! मारोतीभाऊ गौरकार यांच्या वाढदिवशी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

पोकळ हार-तुरे आणि फटाक्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी! मारोतीभाऊ गौरकार यांच्या वाढदिवशी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा; स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत अनोखा उपक्रम



सचिन मेश्राम- मारेगाव 

मारेगाव  :वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, फटाके फोडणे आणि हार-तुरे स्वीकारणे या रूढ परंपरेला छेद देत मारेगाव तालुक्यात एका सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. शेतकरी व वंचितांच्या प्रश्नांवर सदैव लढणारे  मारोतीभाऊ गौरकार यांचा वाढदिवस स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत अत्यंत प्रेरणादायी व शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तकांचे वाटप करून एक नवा आदर्श घालून देण्यात आला.



हा स्तुत्य उपक्रम मारोतीभाऊंचे जावई ॲड. ग्रामगीताचार्य अतुलजी खापणे तसेच राजूभाऊ जांभुळकर दांपत्य यांच्या विशेष पुढाकारातून राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाशजी लांबट होते. प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक आकाशभाऊ बदकी उपस्थित होते. याप्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी मारोतीभाऊंच्या जनसेवेचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्याच्या सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी पुस्तके मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली. "ग्रामीण भागातील तरुणांनी उच्च पदांवर पोहोचून समाजाची सेवा करावी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, हाच या पुस्तक वाटपामागील मुख्य उद्देश आहे," अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.
याप्रसंगी अभ्यासिकेचे संचालक राजेशभाऊ गौरकार, मंगेश अंडरस्कर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञानाची पेरणी करणाऱ्या या संवेदनशील आणि दिशादर्शक उपक्रमाचे मारेगाव तालुक्यात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments