मारेगावात बारुदाच्या ढिगाऱ्यावर नागरिक! भरचौकात फटाक्यांचा उघडाबाजार; नियमांना केराची टोपली
फटाका विक्रीच्या अनियमिततेविरोधात सुरज महाजन यांचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; प्रशासनाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी
मारेगाव : आनंद नक्षणे
सणासुदीच्या उत्साहात मारेगाव शहरात सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नगरपंचायत प्रशासनाने फटाके विक्रीसाठी अधिकृत जागा निश्चित करून दिलेली असतानाही, नफेखोरीसाठी विक्रेत्यांनी थेट वर्दळीच्या रस्त्यांवर आणि आठवडी बाजारातील गर्दीत दुकाने थाटली आहेत. उघड्यावर सुरू असलेला हा फटाक्यांचा बाजार म्हणजे निष्पाप नागरिकांच्या जिवाशी चाललेला थेट खेळ असून, या गंभीर प्रकाराविरोधात जागरूक नागरिक सुरज महाजन यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
### अधिकृत जागेकडे पाठ, गर्दीत बेधडक दुकाने!
दिवाळी व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने परवानाधारक फटाका व्यावसायिकांसाठी नगरपंचायत प्रांगणात सुरक्षित जागा निर्धारित केली होती. मात्र, प्रशासनाचे हे नियम केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे. अनेक विक्रेत्यांनी मुख्य चौकांत, अरुंद गल्ल्यांमध्ये आणि आठवडी बाजाराच्या मध्यभागी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अधिकृत जागा निश्चित करण्यामागील प्रशासनाचा उद्देशच निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
### ठिणगी पडताच भडका उडण्याची भीती; प्रशासनाचे दुर्लक्ष का?
फटाके हे सहज पेट घेणारे आणि स्फोटक स्वरूपाचे असतात. आठवडी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असताना उघड्यावर ठेवलेल्या फटाक्यांच्या साठ्याला एखादी छोटीशी ठिणगी पडली, तरी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दाटीवाटीच्या ठिकाणी आग लागल्यास बचावकार्य करतानाही अडचणी निर्माण होऊ शकतात. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना स्थानिक प्रशासन, नगरपंचायत आणि पोलीस यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
> "फटाक्यांची उघड्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी होणारी विक्री हा नागरिकांच्या जिवावर बेतणारा बेजबाबदारपणा आहे. प्रशासनाने केवळ कागदी नोटिसांपुरते मर्यादित न राहता तात्काळ या नियमबाह्य विक्रीवर कारवाई करावी. अन्यथा उद्या एखादी भीषण दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरही निश्चित होऊ शकते."— सुरज महाजन (तक्रारदार, मारेगाव)
### आता तरी खाकी आणि पालिकेची झोप उडणार का?
तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर झाल्याने आता जिल्हा प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. मारेगाव नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन नियमबाह्य फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार का, तसेच अधिकृत जागेव्यतिरिक्त सुरू असलेली विक्री थांबविणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.
0 Comments