"साहेब, आम्ही जगायचं की मरायचं? शिवरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन"



सचिन मेश्राम -मारेगाव

मारेगाव :तालुक्यातील खडकी-करणवाडी ते घोडदरा-नरसाळा या शिवधुरा (पांदण रस्ता) अतिक्रमणमुक्त करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रश्नावर आंदोलक आणि महसूल प्रशासन या दोन्ही बाजूंचे दावे समोर आले आहेत.

आंदोलकांची बाजू:


उपोषणकर्ते संदीप उमरे व ग्रामस्थांच्या मते, महसूल विभागाने यापूर्वीच रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते, मात्र आजही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. रस्ता मोकळा करण्याऐवजी प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकरी आणि महिला आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाची बाजू:


दुसरीकडे, तहसीलदार उत्तम निलावाड यांनी या प्रकरणावर भूमिका मांडताना सांगितले की, रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही कायदेशीर चौकटीत राहूनच करावी लागते. रस्ता मोजणी आणि अतिक्रमण निश्चितीबाबत काही तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. प्रशासन या प्रश्नावर सकारात्मक असून, नियमानुसार तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायद्याची अंमलबजावणी करताना सर्व बाजूंची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

​सध्या हे आंदोलन सुरू असून, परिसरातील महिला व शेतकऱ्यांनी या लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला आहे. रस्ता मोकळा होण्यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे.