आदिवासी गोवारी समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्या!
भाजप नेते दादाराव बोटरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
यवतमाळ/मारेगाव:
१९९४ च्या ऐतिहासिक नागपूर गोवारी हत्याकांडानंतर भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आदिवासी गोवारी समाजाला आता राजकीय न्याय मिळण्याची वेळ आली आहे. आगामी १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीत गोवारी समाजाचे लढाऊ नेते माधवराव कोहळे यांची आमदार म्हणून वर्णी लावावी, अशी आग्रही मागणी भाजपचे माजी सैनिक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव बोटरे यांनी मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजकीय निष्ठेची दखल घेण्याची वेळ
मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या पत्रात दादाराव बोटरे यांनी समाजाच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे. २३ नोव्हेंबर १९९४ च्या नागपूर विधानभवना समोरील ११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानापासून हा समाज भाजपशी सातत्याने जोडलेला आहे. १९९५ मध्ये युती सरकार स्थापन करण्यापासून ते २०२६ पर्यंत भाजप-सेनेचे शेकडो आमदार निवडून आणण्यात या समाजाचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून या समाजाला विधिमंडळात एकदाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा: माधवराव कोहळे योग्य उमेदवार
माधवराव कोहळे हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. २०२४ च्या निवडणुकीत राळेगाव मतदारसंघात आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके यांच्या विजयात कोहळेंचा मोठा वाटा होता. याच निवडणूक प्रचारादरम्यान आर्णी येथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधव कोहळे यांना सत्तेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता रिक्त असलेल्या १० जागांपैकी एका जागेवर त्यांची निवड करून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी विनंती बोटरे यांनी केली आहे.
४२ मतदारसंघांत निर्णायक समाज
विदर्भातील ११ जिल्ह्यांतील सुमारे ४२ मतदारसंघांमध्ये गोवारी समाज निर्णायक भूमिकेत आहे. या समाजाला सामाजिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माधवराव कोहळे यांच्या रूपाने विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. कोहळे हे समाजाचे सर्वमान्य आणि लढाऊ नेते असल्याने त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश जाईल, असेही पत्रात नमूद केले आहे.
या नेत्यांचाही मागणीला पाठिंबा
या मागणीसाठी दादाराव बोटरे यांच्यासोबत किसान मोर्चा जिल्हा सचिव जितेश राऊत, यवतमाळ तालुका उपाध्यक्ष संतोष वाघाडे, प्रवीण मोगरे, घाटंजी सरचिटणीस कमलाकर नेवारे, सुभाष लसंते (वणी), सतीश दुधकोहळे (झरी), पुरुषोत्तम दुधकोहळे (राळेगाव), प्रशांत लसंते, नंदू नेहारे (पांढरकवडा), संतोष बोटरे (आर्णी) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
0 Comments