​"५ कोटींचा निधी तरीही मुख्य चौक अंधारात! मारेगाव नगर पंचायतीच्या दिरंगाईविरोधात नागरिक संतप्त"

​"५ कोटींचा निधी तरीही मुख्य चौक अंधारात! मारेगाव नगर पंचायतीच्या दिरंगाईविरोधात नागरिक संतप्त"

मारेगाव: सचिन मेश्राम 

शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हायमास्ट लाईट बसवण्याबाबत नगर पंचायत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत हायमास्ट लाईट न बसवल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर 'अर्धनग्न घंटानाद' आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
​पाच कोटींचा निधी गेला कुठे? नागरिकांचा सवाल
​मारेगाव नगर पंचायतने शहरात पथदिवे आणि संवेदनशील ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत ५०० पेक्षा अधिक पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, शहराचे मुख्य केंद्र असलेल्या आंबेडकर चौकाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
​अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
​निवेदनात नमूद केल्यानुसार, हा चौक मुख्य मार्गावर असूनही रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या संथ कामावर कारवाई करून तातडीने हायमास्ट उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
​प्रशासकीय यंत्रणांना 'अल्टिमेटम'
​हे निवेदन मारेगावचे नगराध्यक्ष तथा प्रभारी मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, या निवेदनाच्या प्रती खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
​मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अटळ!
"शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी ५ कोटींचा निधी असताना मुख्य चौकातच अंधार असणे दुर्दैवी आहे. १४ एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने अर्धनग्न होऊन घंटानाद करू."
— निवेदनकर्ते (विलास रायपुरे, आकाश खामनकर, गजानन चंदनखेडे)