धक्कादायक घटना; अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत, गेल्या दोन वर्षांपासून पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील निंभोरा येथील तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला आरोपीपासून मुलगा झाला असून तिने मुलाचा परित्याग केल्याने बाळाला महिला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
निंभोरा येथील आरोपी समाधान गुलाब पारधी या तरुणाने 2020 मध्ये नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला, तू मला आवडते, आपण लग्न करू, दोघे पळून जाऊ, असे सांगितले. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे, असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने, तू माझ्याशी प्रेमसंबंध कर, अन्यथा तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरून मुलीने ‘हो’ म्हटल्यावर समाधान हा पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
प्रेमसंबंधाच्या माहिती नंतर मुलीच्या आईवडिलांनी मुलीचा साखरपुडा 26 जुलै, 2022 रोजी एका तरूणासोबत करून दिला. ती 18 वर्षांची झाल्यानंतर लग्न करण्यात येणार होते. परंतू 9 नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याचे सांगीतले. मारवड पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार, समाधान पारधी यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत