महादीप स्पर्धा परीक्षेत घाटंजी तालुका यवतमाळ जिल्ह्यात अव्वल
गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांना घडणार विमानाने राजधानी दिल्लीची वारी
प्रतिनिधी/ राजु चव्हाण
घाटंजी:- शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित महादिप स्पर्धा परीक्षेत गुणानुक्रमे पात्र ३६ विद्यार्थी दिल्लीची विमानवारी करणार असून घाटंजी तालुक्यातील तब्बल अकरा विद्यार्थी जिल्हास्तरावर पात्र ठरले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण व वेगवेगळ्या उपक्रमासाठी नावलौकिक असलेला घाटंजी तालुका महादीप परीक्षेत अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषद शाळा तिवसाळा येथील तब्बल सात विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून सायतखर्डा,जरंग व झटाळा येथील चार असे घाटंजी तालुक्यातील एकूण अकरा विद्यार्थी या परीक्षेत गुणानुक्रमे अग्रस्थानी आहेत.
शाळास्तरावर इयत्ता ५ वी ते ८ वी करीता वर्षभर राबविण्यात आलेल्या महादीप स्पर्धा परीक्षेत केंद्रस्तरावर पात्र ठरलेले विद्यार्थी तालुकास्तरावर आणि तालुका स्तरावर इयत्तावार प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली होती. शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर दिलेल्या या परीक्षेत जिल्हाभरातून गुणानुक्रमे ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
भारताची राजधानी दिल्ली येथे निवड झालेल्या या विध्यार्थ्यांकरीता पाच दिवसाची सहल आयोजित केली असून विमानाने प्रवास करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांचे मुलं विमानाने दिल्लीला जाणार याचे कुतूहल संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले असून या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.
शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नियोजनबद्ध राबविण्यात आलेली व गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहने, केंद्रप्रमुख सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या परिक्षेकरिता मुख्याध्यापक रामेश्वर भंडारवार शिक्षक काशिनाथ आडे, अतुल वानखेडे, अमोल डंभारे, मनोज उत्तरवार, शरद सोयाम, अभय इंगळे, गजेंद्र ढवळे, रवि नागरीकर, वंदना वघरे, यांनी विध्यार्थ्यांसाठी मेहनत घेतली. विस्तार अधिकारी विजया वैध,केंद्रप्रमुख जानराव शेडमाके,छाया बन्सोड, रवि आडे, अविनाश खरतडे, मोहन ढवळे, अशोक सिंगेवार, किशोर मालवीय यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
*वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून घाटंजी तालुक्यातील विध्यार्थी जिल्ह्यात अग्रस्थानी असून तालुक्यातील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी जादावेळ मेहनत घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, अश्या शिक्षकांसाठीसुद्धा प्रोत्साहन देणारा उपक्रम पुढील सत्रात राबविण्यात येईल.*
*--चंद्रप्रकाश वाहने
गटशिक्षणाधिकारी प.स.घाटंजी*