3 गाड्या एकमेकींवर धडकल्या; ४ ठार, ७ जण गंभीर जखमी
बुलडाणा, आज सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव मार्गावरील वैरागड येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात वैरागड गावाजवळील एका छोट्या घाटात झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो गाड्या सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात होत्या. तर महावितरण कंपनीची सुमो कार खामगावकडून चिखलीच्या दिशेने जात होती. दरम्यान वैरागड गावाजवळील मोहाडी घाटात संबंधित तीन वाहनांना भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये महावितरणाच्या सुमो कारचा चुराडा झाला असून गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही गंभीर जखमी रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.