महावितरणचा कानाडोळा; गलथान कारभारामुळे युवकाचा बळी!
वल्लभ विनायक बोर्डे याचा उच्च दाब वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे जखमी होऊन मृत्यू
सोनपेठ/प्रतिनिधी : सोनपेठ तालुक्यात आणि शहरात महावितरणच्या गलथान दुर्लक्षीतपणाचा कळस गाठला असून या कारभारामुळे एका अठ्ठावीस वर्षीय युवकाला प्राणास मुकावे लागले आहे. लोंबकळणाऱ्या उच्च विद्युत दाबाच्या वीजवाहिन्या दुकानावरुन जात असल्याने व उंच नसल्याने हा अपघात घडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वल्लभ विनायक बोर्डे अठ्ठावीस वर्षीय युवक सोनपेठमध्ये दुचाकी दुरुस्तीसह वॉशिंग सेंटरवर मेहनतीने काम करत होता, ता.२४ रोजी दुपारी तो काम करत असताना ११ के.व्ही.उच्च दाब वीजवाहिनीचा शॉर्टसर्किट होऊन दुपारी ४ वाजता जखमी झाला. यावेळी त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान वल्लभच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील व दोन भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. मृत वल्लभच्या कुटुंबास भरीव मदत करण्याची मागणी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून उच्च दाबाच्या तारा हटवून नागरिकांच्या सुरक्षिततेची मागणी होत असतानाही महावितरण विभाग मात्र याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.