महिलेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, नातेवाईक महिलेच्या घरी जामनेर येथे का गेली असा जाब विचारत महिलेचा विनयभंग, मारहाण व रिक्षाची काच फोडल्याची घटना काल घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दहा जणांविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली या गावी राहणारी महिला तिच्या मावशीच्या गावी जामनेर येथे गेली होती. जामनेर येथे का गेली असे विचारत फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल पालवे याच्यावर सदर महिलेने केला आहे. आजारी मावशीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचा खुलासा सदर महिलेने अमोल पालवे यास केला. या बोलण्याचा राग आल्यामुळे अमोल पालवे याच्यासह रघुनाथ एकनाथ पालवे, विशाल रघुनाथ पालवे, राजु एकनाथ पालवे, सुधाकर एकनाथ पालवे, शुभम अतुल लाड, जितेंद्र दयाराम पोळ, ज्योती जितेंद्र पोळ, सिमा रघुनाथ पालवे व राजु पालवे याची पत्नी (सर्व रा. चिंचोली ता. जि. जळगाव) असे सर्वजण सदर महिलेच्या घरी आले.
विशाल व अमोल यांनी महिलेचा हात धरुन ओढाताण करत अश्लिल शब्दांचा वापर केल्याचा पिडीत महिलेकडून आरोप करण्यात आला आहे. राजु पालवे याने सदर महिलेच्या भावाच्या डोळ्याला दुखापत केल्याचे म्हटले आहे. राजु पालवे, सुधाकर पालवे, विशाल पालवे, अमोल पालवे अशा सर्वांनी पिडीत फिर्यादी महिलेच्या आईला दगड मारल्याने जखमी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच पिडीत महिलेच्या भावाच्या रिक्षाचा काच फोडण्यातत आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी रघुनाथ एकनाथ पालवे, विशाल रघुनाथ पालवे, अमोल रघुनाथ पालवे, राजु एकनाथ पालवे, सुधाकर एकनाथ पालवे, शुभम अतुल लाड, जितेंद्र दयाराम पोळ, ज्योती जितेंद्र पोळ, सिमा रघुनाथ पालवे, राजु पालवे यांची पत्नी अशा सर्व जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला मध्यरात्री भाग ५ गु.र.न. ४९/२१ भा.द.वि. ३५४, १४३, १४७, २९४, ४५२, ३२३, ३३७, ४२७, ५०४, ५०६नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अमोल मोरे यांच्यासह गफ्फार तडवी, रतीलाल पवार व सिद्धेश्वर डापकर करत आहेत.