पाऊस ठरला वैरी, शेतकरी मशागतीत मग्न, अचानक कोसळली वीज, तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
मोहाडी तालुक्यातील खमारी (बूज) गावात घडली घटना, या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त
भंडारा : शेतमशागतीची काम सुरु असताना अचानक ढगांच्या गडगडाटांसह पाऊस सुरु झाला. यावेळी काम सुरु असलेल्या शेतातच वीज कोसळली. या दुर्घटनेत ३ जणांचा जागीच मुत्यु झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खमारी (बूज) गावात घडली आहे. या मृतकांमध्ये २ महिला आणि एका पुरुष मजुराचा समावेश आहे. तसेच शेतमालक रतीलाल उपरडे आणि त्यांची मुलगी पल्लवी, असे दोघे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहे.
अनिता फातू सवालाखे (वय ४५ वर्ष), आशा संपत दमाहे (वय४६ वर्ष), सहीक फीरतलाल उपराडे (वय ४८ वर्ष) असे मृतकांची नावे आहेत. तर रतीलाल उपराडे आणि पल्लवी रतीलाल उपराडे, असे जखमींचे नावे आहेत. जखमी बाप-लेकीवर सध्या भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.