🚨 शाळेजवळ अवैध दारूचा धंदा; ग्रामपंचायतीचे पोलिसांना थेट पत्र
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चिंचोणी बोटेणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लगत अवैध दारू विक्री व मटका-जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, ग्रामपंचायतीने याबाबत पोलीस प्रशासनाकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, चिंचोणी बोटेणी (ता. पं. स. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला लेखी पत्र देत, शाळेजवळ सुरू असलेले अवैध दारू विक्री केंद्र तसेच मटका-जुगार त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही संबंधित अवैध धंदे बंद झालेले नसल्याचे पत्रात नमूद आहे.
शाळेच्या परिसरात अशा बेकायदेशीर गतिविधींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असून, गावातील सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीने केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून आता कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.