शिवसेना वणी शहर संपर्क प्रमुख राजू तुरणकर यांचा राजीनामा
वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी शहर संपर्क प्रमुख राजू किशन तुरणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविला असून, त्यामध्ये पक्षातील अंतर्गत कार्यपद्धती, संघटनात्मक दुर्लक्ष आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित अन्यायाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
राजू तुरणकर यांनी 1994 ते 2006 या काळात विद्यार्थी तालुका प्रमुख, 2006 ते 2011 दरम्यान नगरसेवक, तर 2014 ते 2020 या कालावधीत शहर प्रमुख म्हणून काम केले. 2025 पासून ते वणी शहर संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. प्रदीर्घ काळ पक्षासाठी सामाजिक व संघटनात्मक काम केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, 2025 मधील वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेत योग्य समन्वय, प्रचार यंत्रणा आणि संघटनात्मक पाठबळ न मिळाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुकीनंतर झालेल्या बैठका व कार्यक्रमांमध्ये आपला व शहर संघटकांचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या सर्व घटनांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, कोणताही वाद न वाढवता आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीनाम्याची प्रत जिल्हा व विधानसभा पातळीवरील पक्षनेत्यांनाही पाठविण्यात आली आहे.
या राजीनाम्यामुळे वणी शहरातील शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.