डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात कर्करोगमुक्त कार्यशाळा संपन्न
तालुका प्रतिनिधी-लोकेश दिवे
आजच्या धावपळीच्या जीवनामुळे मानवाची जीवनशैली प्रभावित झालेली आहे. माणसाच्या राहणीमानाच्या आणि खानपानाच्या सवयी बदलत आहेत. याचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर नक्कीच होत असतो. कर्करोग आज भारतामध्ये भीषण रूप धारण करत आहे. याच अनुषंगाने कर्करोग मुक्त अभियान बहुउद्देशीय संस्था नागपूर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील वामनदादा कर्डक सभागृहामध्ये कर्करोगमुक्त अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कर्करोग समुपदेशक व मार्गदर्शक वैभव तेल्हांडे, प्रमुख अतिथी सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक डॉ. चेतना सवाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. विजयता विटणकर, रुपेश तिजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना श्री वैभव तेल्हांडे यांनी मानवी शरीरात जन्मजात या आजाराच्या पेशी असतात. या पेशी वाढण्यासाठी मानवी शरीरात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पेशीची संख्यामध्ये वाढ होते. कर्करोग हा आजार नसून विविध आजारांचा समूह आहे. कर्करोग केवळ तंबाखू किंवा गुटखा खाल्ल्याने होत नाही तर चायनीज फूड, जंक फूड, प्लास्टिक पिशव्यातील पदार्थ आणि या पदार्थातील अजिनोमोटो या रासायनिक पदार्थामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असे सांगितले. भारतात प्रत्येक 10 व्यक्तीमागे एका व्यक्तीला कर्करोग आहे व 2025 पर्यंत हे प्रमाण तीनपैकी एक व्यक्ती हा कर्करोगग्रस्त होईल असा शासनाच्या आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. कर्करोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तरच आपण या आजारावर प्रतिबंध घालू शकतो असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
संस्थेच्या संचालक डॉ. चेतना सवाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला आपल्या खानपणाच्या सवयी बदलावा लागणार आहेत. व्यक्तीच्या नकारात्मक विचारामुळे मानसिक प्रदूषण वाढत आहे. कर्करोगासाठी हे एक कारण सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे सकारात्मक विचारांची गरज आहे. असे प्रतिपादन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या कार्यशाळेतून जे काही ज्ञान प्राप्त होत आहे ते स्वतःपुरतेच मर्यादित न ठेवता कर्करोगावर प्रतिबंध घालण्यासाठी समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. तरच ही कार्यशाळा यशस्वी झाली असे म्हणता येईल असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक प्रशिक गोडघाटे यांनी सर्वांना नशाबंदीची शपथ दिलीव उपस्थितांनी शपथग्रहण केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक मगरदे यांनी केले.
उपस्थितांचे आभार डॉ. विजयता विटणकर यांनी मानले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता डॉ. सुनिता भोईकर, प्रा. बी. एन. खेळकर, डॉ. गणेश गाडेकर, डॉ. माधुरी झाडे प्रा. आशिष कातोरे डॉ.विलास वाणी, प्रा. प्रशांत घुलाक्षे, प्रा. स्वप्निल चव्हाण, प्रा. परमानंद उके, सुनिल खोडे, आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला सुधीर लांबट, संजय गुल्हाने, लोकेश सवाई, रुपेश खंते, सचिन मून, रुपेश पाटील, सुनील खोडे, उपाली सवाई, नीतू भगत, अश्विनी सवाई तसेच रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.