विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाकडून ७० शेतकऱ्यांना 'फवारणी सुरक्षा किट'चे वाटप
दिग्रस :शेतात औषध फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा मृत्यूचा संभाव्य धोका टळावा, या उदात्त हेतूने येथील विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाकडून जवळपास ७० शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किट वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोबतच मंडळाने दोन शेतकऱ्यांना आरतीचे यजमानपद दिल्यामुळे 'शेतकरी- पत्रकार' संबंध दृढ झाले असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही पुनरावृत्ती टळून शेतकऱ्यांना एकाच छताखाली संबंधित किट बाबत सविस्तर माहिती मिळावी, यासाठी विश्व पत्रकार गणेशोत्सव मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांनी पिकांवर औषधी फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. सलग जास्त वेळ फवारणी करू नये, फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधावा, कीटकनाशकांची फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये, फवारणी केल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवावेत, या उपायोजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी एस.एस. राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. रनिंग स्पर्धा, धनुर्विद्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप सोबतच अन्य उपक्रमांचा यात समावेश आहे. शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू, गायक, रुग्ण जवळपास अशा सर्व क्षेत्रातील लोकांसाठी हा गणेशोत्सव मंडळ आपल्या उपक्रमातून धावून जातो आहे. किट वाटप कार्यक्रमावेळी तालुका कृषी अधिकारी एस.एस.राजपूत, आदर्श शिक्षक तथा पत्रकार मजहर खान, बालाजी अर्बन बँकेचे संचालक प्रा. यशवंत सुर्वे-पाटील, सरपंच संघटनेचे विठ्ठल आडे, शिवसेना शहर प्रमुख राहुल देशपांडे, संजय चोपडे, डॉ. अलोने, सरपंच पुरुषोत्तम कुडवे, पत्रकार लक्ष्मण टेकाळे, प्रफुल्ल व्यवहारे, अनिल राठोड आदी उपस्थित होते.