नि:स्वार्थ सेवा : कोरोना योद्धा डॉ.आरती धुमाळ

नि:स्वार्थ सेवा : कोरोना योद्धा डॉ.आरती धुमाळ

 मारेगाव वार्ता/प्रतिनिधी

नवी मुंबई… लोकअर्थाने नियोजनबद्ध शहर. वैद्यकीय सुविधांची प्रचंड रेलचेल. तरीही कोरोना आजाराचा अव्वाच्या सव्वा खर्च कसा पेलवणार या विवंचनेतच सामान्य रूग्ण हतबल होतो. अशाच अत्यंत कठीण काळात साथ मिळाली ती डॉ.आरती गणेश धुमाळ ह्या समाजव्रती डॉक्टरांची. आणि सुरु झाली कोरोना युद्धात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी. या नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर इथल्या हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 
कोरोनाच्या काळात घाबरलेल्या रुग्णांशी त्या स्वतः भरपूर गप्पा मारायच्या. सुसंवादातून त्यांची भीती घालवून आणि मग त्यांना योग्य ते औषधोपचार करायच्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या केस पेपरवर आवर्जून त्या स्वतःचा फोन नंबर लिहून ‘काहीही शंका असेल तर मला कधीही फोन करा’ असे आवर्जून सांगत. कोरोनाचा रुग्ण म्हटलं की, सगळेजण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र डॉ.धुमाळांनी कधीही रुग्णांपासून लांब पळण्याचा प्रयत्न केला नाही. त्या रुग्णाला घरी गेल्यावरही फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करत.
अगदी लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या डॉ.आरती धुमाळ यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी गरजू आणि गरीब लोकांना अगदी कमी शुल्कामध्ये सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. वैद्यकीय सेवा हा डॉ.धुमाळ यांचा श्वास आहे. म्हणूनच या कोरोना काळात संकटामध्ये शासनाच्यावतीने कोरोनाचं काम करत असताना त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही. वर्षभरात शासनाचे कोणतेही मानधन न घेता नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात त्यांनी सेवा निशुल्क सेवा दिली. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना  अशा परिस्थितीच्या वेळी शासन करीत असलेल्या प्रयत्नांत डॉ. धुमाळ जीव लावून आपले काम करीत आहेत. प्रत्येक माणूस आरोग्याच्या दृष्टीने निरोगी रहावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे.
शासनाच्या लसीकरण मोहिमेत अनेक नागरिक लस घ्यायला घाबरत होते.  त्यांनी लसी सदर्भात नागरिकांना माहिती समजून सांगितले व शासकीय सेवेत असलेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी डॉ.आरती धुमाळ म्हणजे वैद्यकीय सल्ला केंद्र  ठरले आहे. अगदी कोरोना असो की, कोणतीही वैद्यकीय मदत लागली यासाठी डॉ.धुमाळ सतत सहकार्य  रूग्णांना करीत असतात. अर्थात यासाठी त्यांना भक्कम साथ मिळाली ती कोकण भवन येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी असलेले पती डॉ.गणेश धुमाळ यांची… यामुळेच कोरोना काळात नवी मुंबई परिसरातील ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.